0
जळगाव : पंचायत राज व्यवस्थेमध्ये ग्रामविकासाचे नियोजन करण्याचे अधिकार ग्रामसभेला प्राप्त झाले. त्यामुळे गावाच्या विकासाचे नियोजन करण्यात ग्रामसेवकाच्या भूमिकेला महत्त्व प्राप्त झाल्याने ग्रामसेवक हा ग्रामविकासाचा केंद्रबिंदू आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री एकनाथराव खडसे यांनी केले.

येथील जिल्हा परिषदेतर्फे आदर्श ग्रामसेवक पुरस्कारांच्या वितरणप्रसंगी श्री. खडसे बोलत होते. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रयागताई कोळी, खासदार ए. टी. नाना पाटील, आमदार सर्वश्री संजय सावकारे, किशोर पाटील, उन्मेष पाटील, आमदार स्मिताताई वाघ, मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष संजय निकम आदी उपस्थित होते.

श्री. खडसे म्हणाले, सर्वांच्या साक्षीने होणाऱ्या सत्कारामुळे आणखी चांगले काम करण्याची प्रेरणा मिळते. चांगलं काम करणाऱ्यांना कौतुकाची थाप ही महत्त्वाची ठरते. ज्या-ज्या गावांचा विकास झाला आहे त्या-त्या गावात ग्रामसेवकांची भूमिकाच महत्त्वाची ठरली आहे. आता ग्रामविकासाचा निधी थेट ग्रामपंचायतींना वितरीत होणार आहे. मनरेगासारख्या योजनांचा निधी गावांना मिळणार आहे. ग्रामसेवक जर चांगला असेल तर गावासाठी स्थायी विकासाच्या सोई निर्माण करण्याचे काम होऊ शकते. आता शासन ग्रामपंचायतींना कायम उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण व्हावे, यादृष्टीने गावांमध्ये असणारे 100 हेक्टरच्या आतील तलाव मासेमारीसाठी ठेक्याने देण्याचे अधिकारही ग्रामपंचायतींना देणार आहे. ग्रामसेवकाने ठरवले तर गाव हागणदारीमुक्त होऊ शकतात. जिल्हा परिषद स्तरावर ग्रामसेवकांच्या प्रलंबित प्रशासकीय कामांचा निपटारा करण्यासाठी विशेष मोहिम राबवावी, असे निर्देशही त्यांनी जिल्हा परिषद प्रशासनाला दिले.

ई-सुविधांच्या माध्यमातून ग्रामसेवकांनी द्यावयाच्या सुविधांसाठीही संगणकाची सोय करुन ग्रामसेवकांचे कार्यालय पेपरलेस करण्याला शासनाचे प्राधान्य आहे. ग्रामसेवकांच्या असणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करु, असे आश्वासन श्री. खडसे यांनी दिले.

मान्यवरांच्या हस्ते ग्रामसेवकांना पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. श्री.महाजन, श्री. पाण्डेय यांनीही विचार व्यक्त केले. प्रास्ताविक श्री. निकम यांनी केले तर आभार उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजन पाटील यांनी मानले.

या कार्यक्रमास जिल्ह्यातील ग्रामसेवक व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

Post a Comment

 
Top