| धुळे : शासनाच्या विकास कार्यक्रमांना साह्यभूत ठरणारा मानव विकास कार्यक्रम असून याचा निर्देशांक वाढवून शाश्वत विकासाच्या उद्देशाने कार्यक्रम राबवावा, असे आवाहन राज्याचे मानव विकास आयुक्त भास्कर मुंढे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात मानव विकास कार्यक्रमाच्या आढावा बैठकीत श्री. मुंढे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे, उपवनसंरक्षक एस. जी. हलमारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अरविंद मोरे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मोहन देसले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बाल कल्याण) आर. आर. तडवी, जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे, कार्यकारी अभियंता वाय. एस. बिऱ्हाडे, कृषी महाविद्यालयाच्या डॉ. रितु ठाकरे, एस.टी. महामंडळाचे विभागीय वाहतूक अधीक्षक हंसराज पाटील, गट शिक्षणाधिकारी श्रीमती एस. एन. देवरे (धुळे), एम.आर. कुवर (शिरपूर), मनीष पवार (शिंदखेडा), के. ए. पाटील (साक्री), शिक्षण विस्तार अधिकारी व्ही. ए. पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. व्ही. पाटील (धुळे), डॉ. ए. एच. लोया (शिरपूर), डॉ.संजय मोरे (शिंदखेडा), डॉ.विक्रम वानखेडे (साक्री) आदी उपस्थित होते. श्री. मुंढे म्हणाले, मानव विकास कार्यक्रमांतर्गत मोठ्या गावातील विद्यार्थ्यांकरिता अभ्यासिका सुरू करण्यात आलेल्या आहेत. त्या अभ्यासिकांना शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी भेटी देणे आवश्यक आहे. मुलींसाठी गाव ते शाळा यादरम्यान उपलब्ध करून देण्यात आलेल्या बस सेवेत इतर प्रवाशांना प्रवेश देऊ नये याची दक्षता एस. टी. महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी घ्यावी. तालुक्याच्या ठिकाणी बालभवन-विज्ञान केंद्र स्थापन केल्यामुळे विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढली आहे. त्याचप्रमाणे आतापर्यंत राबविण्यात आलेल्या विविध घटकांचे मूल्यमापन यशदा, पुणे यांच्याकडून करून घेण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले. आरोग्य विभागाने जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमधून आरोग्य शिबिरांचे आयोजन करून तज्ज्ञ डॉक्टरांकडून गरोदर महिलांची तसेच 0 ते 6 महिने वयोगटातील बालकांची व मातांची तपासणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे बालमृत्यू आणि माता मृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. जिल्ह्याकरिता सुसज्ज अशा फिरत्या माती परीक्षण प्रयोग शाळांची दोन वाहने पुरविण्यात आलेली आहेत, त्यांचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी कृषी विभाग आणि कृषी महाविद्यालयाच्या अधिकाऱ्यांनी प्रयत्नशील असणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. मानव विकास निर्देशांक आरोग्य, शिक्षण आणि रोजगाराच्या संधी (दरडोई उत्पन्न) या मुलभूत घटकांच्या मोजपट्टीने काढला जातो. त्याकरिता यात वाढ होण्याच्या दृष्टीने नवीन योजना लोकप्रतिनिधींकडून सूचविल्यास त्या योजनांचा विचार करण्यात येईल, असेही श्री.मुंढे यांनी सांगितले. श्री.मिसाळ म्हणाले, जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानात चांगली कामे झालेली आहेत. त्यासोबतच शेतकऱ्यांच्या सुविधेकरिता मानव विकास कार्यक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या माती परीक्षण प्रयोगशाळांचा जास्तीत जास्त लाभ शेतकऱ्यांना करून देण्यात येईल. त्यासाठी सक्षम स्वयंसेवी संस्था पुढे आल्यास त्यांना प्राधान्याने संधी दिली जाईल. याकरिता कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित इच्छूक स्वयंसेवी संस्थांकडून परिपूर्ण प्रस्ताव सादर करावेत. त्याचबरोबर ग्रामीण भागातील युवकांना स्वयंरोजगाराकरिता कौशल्य वृद्धीचे विविध प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करण्यात येईल. |
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment