0
चित्रफीत पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
अहमदनगर : देशाला स्‍वतःच्‍या पायावर उभी करणारी प्रधानमंत्री मुद्रा योजना असून बेरोजगारांनी याद्वारे मिळणाऱ्या कर्जातून आर्थि‍कदृष्‍ट्या संपन्‍न होऊन कर्जाची परतफेड करुन इतरांनाही लाभ होईल यासाठी दक्ष रहावे, असे आवाहन लोकसभेच्‍या सभापती सुमित्रा महाजन यांनी केले.

प्रधानमंत्री मुद्रा योजनेत गरजवंतांना अर्थसहाय्य मार्गदर्शन आणि धनादेश वाटप सोहळ्यात श्रीमती महाजन बोलत होत्‍या. कार्यक्रमाला पालकमंत्री प्रा.राम शिंदे, माजी मंत्री बबनराव पाचपुते, आमदार बाबासाहेब मुरकुटे, जिल्‍हाधिकारी अनिल कवडे, मुख्‍य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल, महापालिकेचे आयुक्‍त विलास ढगे, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे मुख्‍य महाव्‍यवस्‍थापक श्री. यू. मोहपात्रा, बँक ऑफ महाराष्‍ट्रचे कार्यकारी संचालक आर.के. गुप्‍ता, सीबीआयचे फील्‍ड महाव्‍यवस्‍थापक नरेंद्र सिंग, अश्‍विनी भाटिया, नानासाहेब जाधव, प्रा.भानुदास बेरड आदी उपस्थित होते.

यावेळी चार रुग्‍णवाहि‍कांचा लोकार्पण सोहळा आणि‍ खासदार गांधी मोबाईल अॅपचे लोकार्पण उपस्‍थि‍त मान्‍यवरांच्‍या हस्‍ते झाले.

श्रीमती महाजन यांनी या योजनेचे महत्त्‍व सांगितले. आपल्‍या देशातील बेरोजगार तरुणांना स्‍वतःच्‍या पायावर उभे करणारी ही योजना आहे. असंख्‍य तरुणांना कर्ज मि‍ळाले तर ते स्‍वयंरोजगाराच्‍या माध्‍यमातून सक्षम होतील आणि‍ त्‍यातून देश सक्षम होईल. आज साऱ्या जगाचे लक्ष भारताकडे लागले असून वि‍श्‍वाला मार्गदर्शन करण्‍याची क्षमता देशात आहे. स्‍त्रि‍यांचे समाजातील स्‍थान महत्‍त्‍वाचे असून ती जर सक्षम झाली तर कुटुंबाला सक्षम करु शकते, हे त्यांनी सोदाहरण सांगि‍तले.

पालकमंत्री प्रा. शिंदे म्‍हणाले, सर्वसामान्‍य लोकांना वि‍कासाचा केंद्रबिंदू मानून शासन योजना आखत असते. बँकांनी कर्ज देताना सकारात्‍मक वि‍चार करुन कर्जपुरवठा करावा. घेतलेले कर्ज बँकांना वेळेत परत करण्‍याची काळजीही संबंधि‍तांनी घ्‍यावी. जि‍ल्‍ह्यात आतापर्यंत प्रधानमंत्री मुद्रा योजनेखाली सुमारे 37 कोटी रुपयांचे वाटप करण्‍यात आल्‍याची त्‍यांनी माहि‍ती दि‍ली.

प्रास्‍तावि‍क खासदार दि‍लीप गांधी यांनी केले. यावेळी श्री. मोहपात्रा, श्री.गुप्‍ता, श्री. सिंग, श्रीमती भाटिया, नानासाहेब जाधव यांचीही भाषणे झाली. यावेळी श्रीकांत साठे, गि‍ता गि‍ल्‍डा, जयश्री कुलथे, सुवेंद्र गांधी आदी उपस्‍थि‍त होते. आभार प्रा.भानुदास बेरड यांनी केले.

Post a Comment

 
Top